“चौकट वाटोळी”वरील एक अभिप्राय

 

अविनाश, तुमचं ‘चौकट वाटोळी‘ वाचलं. खूप आवडलं! मी समिक्षक-टिकाकार नसून फक्त वाचक आहे. मुखपृष्ठ आकर्षक, लिखाण साधं सोपं. अलंकार-उत्प्रेक्षा नाहीत. वळणं-आडवळणं नाहीत. प्रवाही लेखन. सस्पेन्स-गूढ नसतानाही उत्कंठा वाढत जाते..वाचत रहावं वाटत रहातं.. विषय परीचयाचा, तरीही ‘आता पुढे काय?’ हे पहायचं भान वाढत जातं! आत्ताच्या काळाचं भान येत रहातं. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडून स्वत:चा मार्ग शोधणारी नायिका न पटता पटायला लागते! तिला आवडणारा आडदांड सेक्स बोल्ड असूनही गैर वाटत नाही.. हे वास्तव नजरेआड करता येत नाही! तुमची पहिलीच कादंबरी पुढच्या अपेक्षा वाढविते. कधी कधी थोडी नाटकी वाटते.. उदा, सासूने केलेली कलालांची उलटतपासणी! राउण्ड वन गो टू सासू.. वगैरे. पुस्तक वाचायला उशीर झाला, कारण पंधरा दिवसद मी बाहेर होतो आणि लायब्ररीची आधी आणलेली पुस्तकं वेळेवर परत करायची होती.. पण वाचायला घेतल्यानंतर ते दिवसभरात संपलं. हे पुस्तकाचं यश! ‘चौकट वाटोळी’ हे नाव कसं सुचलं?

वाचताना हे जाणवत होतं की आपण एक सुक्ष्म (mini) महाभारत वाचत आहोत.. तसं महाभारत तर प्रत्येक घरात, समाजात घडत असतं.. हेवे-दावे, ईर्षा, शह-काटशह-प्रतिशह, महत्त्वाकांक्षा, स्वार्थ,मनाची आंदोलनं चालतच असतात! आणि शेवटी हार-जीत कुणाची होते? तर कुणाचीच नाही.. महाभारत घडून गेल्यावर.. फक्त एक अस्वस्थ शांतता.. सगळे विजयी पांडव एकाकी चालत रहातात! चौकट वाटोळी होत, सासूच्या व्यवहारी भूमिकेनं चौकटच रहाते! तुम्हाला असंच म्हणायचं होतं की नाही हे माहीत नाही.. पण मला मात्र असं वाटलं.

अभिप्राय : सतीश सुंके, ठाणे.