जगणं शिकवणारी चाणक्यांची “जीवनसूत्रे”
आर्य चाणक्यांचे तत्त्वज्ञान सर्वपरिचित आहे. जगभर चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. दोन हजार वर्षांचा काळ लोटला असला तरी चाणक्यांनी सांगितलेली ‘जीवनसूत्रे’ ही आजही व्यक्तिमत्त्व विकास, आचरण, व्यवहारिक कौशल्य, आदर्श राजसत्ता, प्रशासन, आधुनिक व्यवस्थापन कसं असावं यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आज परिस्थिती बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे जगण्याची शैली, गरजा बदलल्या आहेत. चाणक्याच्या काळानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहे, प्रशासन बदललं आहे. चाणक्यांच्या सूत्रातील तपशील जरी बदलला असला, तरी ‘तत्त्व’ म्हणून ते आजही कसे उपयुक्त आहेत हे “चाणक्यांची जीवनसूत्रे” या पुस्तकातून जाणवेल. लेखक सुधाकर घोडेकर यांनी या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत, रोजच्या जगण्यातील उदाहरणांसह ही सूत्रे सांगितली आहेत.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण जगण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. कुणाला आदर्श पालक, गुणवंत विद्यार्थी, यशस्वी उद्योजक व्हायचंय, तर कुणाला आदर्श अधिकारी किंवा प्रशासक. प्रत्येकासमोरील आव्हानं वेगळी आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी चांगली नोकरी मिळवणे, ती टिकवणे, आरोग्य जपणे, आर्थिक स्थैर्य असे अनेक प्रश्न तरूणांच्या चिंतेचे विषय बनले आहेत. यावर चाणक्यांनी उपयुक्त उपदेश दिले आहेत. सध्याच्या काळातील धकाधकी, स्पर्धा, वाटणारी असुरक्षितता, भीती, तंत्रज्ञानामुळे दिवसागणिक बदलणारी जगण्याची समीकरणं यांचा विचार करून उपयुक्त वाटणारी नेमकी सूत्रं या पुस्तकात मांडली आहेत.
फार थोडं साहित्य असं असतं की, ते काळाच्या कसोटीवर पूर्ण उतरून हजारो वर्ष मानवजातीला उपयुक्त ठरत राहतं. आर्य चाणक्यांची जीवनविषयक सूत्रे जवळपास अडीच हजार वर्षं लोकांना मार्गदर्शक ठरली आहेत. खरंतर चाणक्याचे जीवनविषयक तत्त्व, मूल्य सांगणारे अनेक साहित्य आज उपलब्ध आहे. त्यामुळे “चाणक्यांची जीवनसूत्रे” या पुस्तकात मांडलेले सूत्र म्हणजे नवीन काय आहे असा प्रश्नही अनेकांनी पडेल.
जी-जी मूल्यं सगळ्यांनाच माहीत आहेत त्यावर नवीन काय सांगणार असंही वाटेल. आळस टाळा, वेळेचा सदुपयोग करा, भरपूर कष्ट करा, संयमित राहा, स्वच्छता सांभाळा, अडचणींसाठी सिद्ध राहा असे उपदेश आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आर्य चाणक्यांची सूत्रे सुभाषित म्हणून आपण वाचलेली असतात. या सुभाषितांमधील अर्थ आपल्याला कळतो पण ते आपण आचरणात आणत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचा अर्थ व त्याचं गांभीर्य आजच्या संदर्भात किती योग्य आणि आवश्यक आहे, याचा फारसा विचार आपण करत नाही. हे गांभीर्य आणि त्यांचं महत्त्व विविध उदाहरणांद्वारे पटवून देण्याचं काम हे पुस्तक करेल.
अशा प्रकारे प्रस्तुत पुस्तकात माणसाचं जगणं नीतिमान करणारी, त्याच्यातली कार्यप्रवणता वाढविणारी, जगण्यातलं एक वेगळं परिमाण बहाल करणारी काही सूत्रे दिली असून, आजच्या संदर्भात त्याची उपयुक्तता किती मोठी आहे, याचं परिणामकारक विवेचन केलेलं आहे. हे प्रत्येक सूत्र तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक नवा दृष्टिकोन देईल एवढं नक्की.