‘मोघ पुरुस’ या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय

 मोघ पुरुस या कादंबरीविषयी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि भारत सासणे यांचा अभिप्राय

 

मोघ पुरुस मराठीतली एक महत्त्वाची, समकालीन प्रयोगशील कलाकृती

प्रतिक पुरी यांची ‘मोघ पुरुस’ ही कादंबरी, सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे अनेक प्रकारचे विस्फोट होण्याच्या कालखंडात आली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही दहशतीचं एक वातावरण असताना, भीतीच्या छायेखाली लोक वावरत असताना, या पुस्तकातला महंमद पैगंबर, बुद्ध, कृष्ण, साहित्यिक आणि तत्त्वज्ञानात्मक व्यक्तिरेखा, देवकोटीत जाऊन पोहोचणारी सर्व महापुरुष मंडळी, प्रस्तुत कादंबरीत एकत्र करणं, पचवणं, त्यांचा आपसांमध्ये संवाद घडवणं, त्यांचं स्वगत सांगणं, प्रत्येकाचं मनोविश्लेषण मांडणं, आणि या सर्वांमध्ये विकृती, क्रौर्य, विसंवाद, अशास्त्रीयता, अंधश्रद्धा, श्रद्धा या सगळ्यांना कट्टर तात्त्विक, वैचारिक, व्यावहारिक विरोध पेलून एक कलाकृतीचा प्रयत्न करणं, ही अवघड गोष्ट आहे. आणि तरीही कादंबरीचे नियम सांभाळतच नवीन प्रयोग करणारी ही कलाकृती आहे.

मोघ पुरुस म्हणजे अव्यवहारी; पण सत्याच्या शोधात असलेला मानवतावादी माणूस. मोघ पुरुस म्हणजे अज्ञानी पुरुष असाही एक अर्थ आहे; पण प्रत्यक्षात हा ज्ञानाचाच खेळ आहे. लेखकाची भूमिका ही देव-धर्म न मानण्याची आहे. पण देव मानणारा माणूस हा लेखक मानतो आहे. धर्म मानणारा माणूस हा त्याच्या चिंतनाचा, तळमळीचा व कळकळीचा विषय आहे. ही अत्यंत वेगळी भूमिका आहे. जग धार्मिक आहे आणि ते बदलता येत नाही. प्रत्येक धर्माचे महापुरुष हे एकमेकांच्या विरोधात नसले, तरीही त्यांचे भक्त मात्र एकमेकांच्या विरोधातले आहेत हे आपण अनुभवतो आहे. या परिस्थितीत हे बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक जग तुम्ही मानवतेच्या एका सूत्रात कसं बांधणार? माणसाचा विकास तरी कसा करणार? विकासाचं युग केवळ जाहिरातीतून आणि थापा मारून आपल्याला सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी शांतता पाहिजे आणि शांततेसाठी धार्मिक भांडणं मिटायला हवीत. ही भांडणं मिटवायची असतील तर मेंदूतला देव बाजूला ठेवला पाहिजे. हे जर करायचं असेल, तर धर्म मानणा-या बहुसंख्य लोकांच्या या जगात कसं वावरायचं याची विज्ञानवादी भूमिका या पुस्तकात मांडली आहे. त्यामुळेच ही कादंबरी ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, तात्त्विक, तथ्यांची संवादी बेरीज मांडणारी आहे, असं मला वाटतं. यात संघर्ष नाही, तर एकूणच संस्कृतीचा गोफ गुंफलेला आहे. भूतकाळातून वर्तमानापाशी येत भविष्याशी सांधेजोड करणारी ही कादंबरी आहे.

ही कादंबरी मनोविश्लेषणात्मक आहे. दुःखाचा शोध आणि सत्याचा प्रवास हे या कादंबरीचं उद्दिष्ट आहे. ही कादंबरी माणूसकेंद्री आहे, त्यामुळे यात ईश्वरविरोधी चिंतन आहे. आस्तिकता श्रेष्ठ की नास्तिकता हा वाद जुना आहे. कोणांतही अंतिम सत्य दडलेलं नाही. पण इथं लेखकाची भावना ही प्रामाणिकपणाची आहे. तो देव आणि धर्म नाकारतो आणि माणसाला निर्णायक महत्त्व देतो. प्रेमापेक्षा जगात दुःखद असं काही नाही, प्रेमामुळेच दुःख निर्माण होतं अशी वेगळी मांडणी यात आहे.

लेखकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही देवाला, देवदूताला, प्रेषिताला केवळ ‘माणूस’च मानतोय, व त्यांना ‘महामानव’ म्हणूनच ओळखतो. माणूस या नात्यानंच त्यांची आत्मकथनं यात आहेत. मानवी मनांतील जातिधर्माची जळमटं दूर करणं हा या कादंबरीचा उद्देश आहे आणि त्यासाठी लेखक लिखाणाचं माध्यम निवडतो आहे. शाश्वत, वैश्विक प्रेमासाठी ही शोधयात्रा आहे. मराठीतली ही एक महत्त्वाची, समकालीन व प्रयोगशील कलाकृती आहे, असं मी मानतो.

–          श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक .भा..साहित्य संमेलनाध्यक्ष

 

माणसाला माणुसकीचा मार्ग दाखवणारी कादंबरी

‘मोघ पुरुस’ ही प्रतिक पुरी यांची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘मोघ’ या शब्दाचा अर्थ आपण शब्दकोशांत शोधला, तर ‘स्वतःला अज्ञानी म्हणवणारा’ असा त्याचा एक अर्थ दिलेला आहे. स्वतःला अज्ञानी म्हणवणा-यांना खरंतर तो अज्ञानी नसतो हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना प्रश्न पडतात आणि ज्यांना ज्यांना परंपरेमध्ये प्रश्न पडलेले आहेत, मग ती ग्रीक परंपरा असो, तिथे सॉक्रेटिस अनेक प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरेही देतो, त्यांतून पुन्हा प्रश्न विचारतो, आणि बाजारात उभे राहून तिथे ही चर्चा व्हायची. ही प्रश्नांची परंपरा आहे आणि आपल्याकडेही उपनिषदांच्या माध्यमातून माणसाच्या मूलभूत जगण्याविषयीचे प्रश्न विचारले गेले आहेत व ती परंपरा आपल्याकडेही आहे. हा जो मोघ पुरुस आहे, ज्याच्याबद्दल प्रतिक सांगतोय, आणि बोलतोय, तो अंतिमतः ज्या कुठल्या आशावादाकडे येऊ पाहतोय, तो आशावाद महत्त्वाचा आहे. कारण तो याच उपरोल्लिखित परंपरेशी संबंधित आहे.

देवाचा शोध कोणी लावला याबद्दल आपल्याकडे खूप चर्चा झालेली आहे. अर्थात, त्यावर सुटसुटीतपणे कोणी कादंबरी लिहिली आहे का असं विचारलं, तर कोणतंच नाव समोर येत नाही. पण हा विचार सर्वस्वी खूप नवा आहे अशातला भाग नाही. देवाच्या या शोधापासून प्रतिक सुरुवात करतो. हा त्याचा प्रारंभबिंदू आहे; पण त्याबद्दल त्याला काही बोलायचं आहे असं मला वाटत नाही. माणसाचा शोध देवानं लावला हे तर सर्वांनी सांगितलंच. जे धर्मसंस्थापक आहेत, ते माणसाच्या आस्थेच्या संदर्भात बोलतात. माणूस आणि माणसाचं अस्तित्त्व आणि माणसाचं जगणं, त्याचे प्रश्न जे काही आहेत, त्याबदद्ल विशेषकरून चर्चा झालेली आहे.

या कादंबरीची एक गंमत अशी आहे की, बुद्ध, महावीराचा काळ व त्यांची चर्चा यात येतेच येते; पण यात एक लेखकही आहे, जो स्वतःला ‘विवेका’चा आवाज समजून इथं वावरतो. मला ही विशेष बाब वाटते. हा विवेक तुमचा-आमचाही विवेक आहे. हा विवेक, मन, गौतम, वेताळ, मोहम्मद, कृष्ण, येशू, तुकाराम, राम, ज्ञानेश्वर, नचिकेत, शंबूक, अश्वत्थामा अशी अनेक पात्रं यात येतात. या सर्वांनी परस्परांशी संवाद केलेले आहेत. आणि या सर्वांच्या संवादांनंतर विवेक येऊन स्वतःचं मत मांडतो आहे. त्यामुळे विवेकाचा आवाज जसा जागृत आहे, तशीच संवादाची एक सलग पार्श्वभूमीही त्याला आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सांगतो आहे. हे सांगणं ‘देव’ या संकल्पनेविषयी आहे. आपल्या संपूर्ण परंपरेत काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे जन्म, पुनर्जन्म, जीवन, मृत्यू, आणि या सर्वांचा नियंता म्हणून जर कोणी असेल तर तो देव. आता यात सांगितलेली ‘प्रेम’ ही संकल्पना सर्वच संस्थापकांनी सांगितली आहे. बायबलमध्ये स्थळ, काळ, पदार्थ यांच्यापलीकडे जाऊन ईश्वर आहे असं सांगितलं असलं, तरीही येशू प्रेमावर जास्त भर देतो. प्रतिकही त्यावर भर देतो ही मला अतिशय महत्त्वाची बाब दिसते. देव आहे की नाही या संकल्पनेवर तुम्ही किती डोकेफोड करणार आहात, हा प्रश्नच आहे. कारण देव हा माणसांनीच स्वतःच्या संरक्षणासाठी शोधलेला आहे. आता प्रतिक यासंबंधी बोलताना या कल्पनेच्या पुढे जाऊन एका आशावादाभोवती ही कादंबरी गुंफतो. त्यांत प्रेम आणि माणुसकी हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. माणसाला माणसासारखं जगणं का अवघड झालं आहे, या प्रश्नाभोवती ही कादंबरी फिरते. त्याची उत्तरंही तो शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा माणूस आणि त्यानंतर येणारी माणुसकी हे जे काही अंतिम सत्य आहे असं जेव्हा तो म्हणतो, ते मला महत्त्वाचं वाटतं.

आजच्या समकालीन परिस्थितीमध्ये ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानून माणसाविषयीच्या आस्थेनं काही लिहिणं ही अत्यंत दुर्मिळ होत चाललेली बाब आहे. त्यासाठी या लेखकाचं अभिनंदन करायला पाहिजे की, त्याने हा वेगळा विषय हाताळला आहे. हे एक अवघड आव्हान आहे. प्रश्न विचारणं, आव्हान देणं आणि चिंतन करण्याची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहेच. कबीर आणि झरतृष्ट यांचे उल्लेख मला यात आढळले नाहीत, ज्यांनी प्रेमाविषयी खूप काही लिहिलं आहे. पण ही कांदबरी शेवटी त्याच सत्याकडे घेऊन जाते, निष्कर्षाकडे घेऊन जाते की, ‘माणसाला जर जगायचे असेल. तर त्याला माणुसकीशिवाय दुसरा कोणताही तरणोपाय नाही. आणि ही माणुसकी जर जपायची असेल, त्याला तर ती प्रेमातून जपावी लागेल. त्यासाठी त्याला त्याचा अहंकार त्यागावा लागेल. त्यातूनच हा मनुष्य आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवेल आणि ‘माणूस’ म्हणून त्याला जगता येईल.’ सर्व चिंतकांनी, धर्मसंस्थापकांनी, कवींनी, तत्त्वज्ञांनी जे चिंतन केलं आहे, त्याकडेच शेवटी ही कादंबरी आपल्याला घेऊन जाते, हे महत्त्वाचे आहे.

देवाविषयी सांगताना लेखक असं लिहितो की, “मी देव मानत नाही. देव ही जगातली सर्वांत मनमोहक आणि पवित्र अंधश्रद्धा आहे. जगातील अन्य सर्व अंधश्रद्धांची जनक व जननी म्हणजे देव. देव मानणं किंवा भुतावर विश्वास ठेवणं या दोन्ही गोष्टी माझ्या दृष्टीने केवळ अंधश्रद्धाच आहेत. कारण या दोन्ही गोष्टी अस्तित्त्वात नाहीत. त्यामुळे मी नास्तिक आहे.” जगभरातल्या चिंतकांनी पुढे काय होणार आहे यावरची चर्चा करत असताना असं सांगितलं आहे की, कदाचित इथून पुढे धर्म अस्तित्त्वात राहणार नाही. पण माणूस टिकायचा असेल, तर त्याला ‘माणूस’ म्हणून जगणं भाग आहे. धर्माचा त्याग केल्यानंतरच माणूस उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे पुढे प्रगती करू शकेल. आणि त्यांच्यातूनच त्याचं उन्नयन होणार आहे. या पद्धतीचा जो आशावाद आहे, तो या कादंबरीत मांडला आहे. शेवटी माणुसकी शिल्लक राहील आणि हे सांगणारे जे कोणी असतील, ते ‘मोघ पुरुस’ असतील. स्वतःला अज्ञानी म्हणवणारेदेखील प्रश्नांच्या माध्यमातून चिंता व चिंतन करणारे हे ‘ज्ञानी मोघ पुरुस’ आहेत. हे कायम येत राहतील आणि त्यांच्या या प्रश्न विचारण्यामुळे माणसाचे भवितव्य हे कायम राहणार आहे, अशा प्रकारचं एक सूत्र या कादंबरीत मांडलेलं आहे. मला ते आकर्षक वाटतं. एकूण कादंबरीचा जो रूपबंध आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा व चतुरपणे मांडलेला आहे. त्याच्यासाठी लेखकाचं अभिनंदन करायला पाहिजे. हा एक नवा प्रयोग आहे, तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे.

–          भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक