वाचाव्याच अशा मराठीतील 10 अर्थपूर्ण कादंबऱ्या
1. फकिरा – अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठेंनी जे लिहिलं, ज्यांच्याविषयी लिहिलं ती सारी भोवतालची माणसं होती. ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात आणि प्रसंगी प्राणही देतात. इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या फकिराची शौर्यगाथा ही सामाजिक आणि कलात्मकदृष्ट्याही श्रेष्ठ आहे. ‘फकिरा’चे भारतीय भाषांबरोबर रशियन, चेक, पोलिश, जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहेत.
इंग्रजी राजवटीच्या दरम्यान भारतीयांची होणारी होरपळ, उपेक्षित समाजाची होणारी हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा जुलूम या सर्वांच्या विरोधात बंड करणारा मातंग वाड्यातील ‘फकिरा’ हा या कादंबरीचा नायक आहे. ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट फकीरा कादंबरीवरच आधारित आहे.
2. धग – उद्धव शेळके
उद्धव शेळके यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते समाजातील खालच्या थरांतील माणसांच्या जीवनाकडे सहानुभावाने पाहतात. सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावनांचे ते चित्रण करतात. जातीव्यवस्था आणि परंपरा केवळ उतरंडीतल्या तळातल्याच नाही तर मध्यम स्तरावरील वर्गालाही कशी छळते हे ‘धग’ या कादंबरीतून त्यांनी मांडले आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी आहे. कादंबरीची नायिका कौतिक शिंपीण आहे. ती हिमतीवर नवरा आणि दोन मुलांचा संसार रेटते. तिचा एक मुलगा भीमा गुंड बनतो. दुसरा नामा, त्याची आयुष्यभर परवड होते. पारंपारिक शिंपी जातीची विद्या जातसमूहातून तर त्याला नीटपणे मिळतच नाही, पण त्याला गरिबीमुळे शिक्षणही मिळत नाही. कौतिकचा नवरा, महादेवला जातीच्या प्रतिष्ठेची भावना असते, पण त्याचा कुटुंबाच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी शून्य उपयोग होतो. या सगळ्यात परवड होते ती कौतिक आणि नामा या मायलेकरांची. ते एका छताखाली राहूनही खऱ्या अर्थाने एकत्र नसतात. वर्तमानात त्यांच्या हाती फक्त परात्मता हाती येते. आणि दुसरीकडे त्यांना पारंपारिक नात्यांचा आधारही उरत नाही.
3. कोसला – भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडेंची ‘कोसला’ ही मराठीतील सर्वाधिक चर्चिली गेलेली कादंबरी. 1963 साली ही कादंबरी अवतरली. मात्र मराठी मनावरील तिचे गारुड आजही कायम आहे. ‘कृषक किंवा ग्रामीण समूहाच्या परात्मतेचा सर्वोच्च अविष्कार’ या शब्दात समीक्षकांनी कोसला चा गौरव केला. कोसलापूर्व आणि कोसलानंतरची मराठी कादंबरी अशीही विभागणी केली जाते, यावरून कोसला चे मोठेपण लक्षात येते. कोसलाचा प्रभाव तिच्या वाचकांच्या सर्वच पिढ्यांवर पडला. हा प्रभाव साधासुधा नाही. कोसलाच्या प्रभावातून शहरात राहणारे आणि मूळचे गावकडचे तरुण परत ग्रामीण भागात पुन्हा स्थलांतरित झाले.
4. सात सक्क त्रेचाळीस – किरण नगरकर
किरण नगरकर हे फॅन्टॅस्टिक स्टोरिटेलर आहेत हे ‘सात सक्क त्रेचाळीस’ ने सिद्ध केले. सिनेमा बघत असल्याच्या अनुभवात ही कादंबरी घेऊन जाते. कादंबरीला सलग असे कथानक नाही; तर घटनांचे अनेक तुकडे आहेत. नगरकरांनी त्या तुकड्यांची कौशल्याने मांडणी केली आहे. कादंबरीत चित्रपटासारखे फ्लॅशबॅक्स आहेत.
5. गणुराया आणि चानी – चि त्र्यं खानोलकर
अनुभवांची तीव्रता आणि काव्यात्मकता ही या कादंबरीची वैशिष्ट्ये. मानवाच्या आदिम भावना, हिंसा, लैंगिकता आणि त्यामुळे माणसांच्या आयुष्याची होणारी ससेहोलपट खानोलकर साकारतात. ‘गणुराया’ ही कौटुंबिक जबाबदारीत अडकलेल्या तरुणाची कहाणी आहे. तर ‘चानी’ ही गावाने कलंकित ठरवलेल्या मुलीची कहाणी.
6. ताम्रपट – रंगनाथ पठारे
 ‘ताम्रपट’ ही कादंबरी समाजातील विसंगती बारकाईने टिपते आणि या व्यामिश्रतेची उकल करण्यास प्रवृत्त करते. १९४२ ते १९७९ असा दीर्घ कालपट असलेली ही कादंबरी महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक अंगाने वेध घेते.
7. नातीचरामि – मेघना पेठे
स्त्रीने स्पष्ट व सरळ भिडणारे स्त्री-पुरूष संबंधांचे स्त्रीच्या दृष्टीकोनातून येणारे वर्णन मराठी कादंबरीत नव्यानेच आल्याचा अनूभव मेघना पेठे यांची ‘नातीचरामि’ कादंबरी देऊन जाते. स्त्रीचा एकाकीपणा आणि तुटलेपणा कादंबरीच्या पात्रांमधून जाणवत रहाताे. ही नायिका मनाच्या, शरीराच्या हाका निःसंकोचपणे मान्य करते. लपवाछपवी करीत नाही की कसला दांभिकपणाचा आवही आणित नाही. स्त्रीलाही पुरूषदेहाविषयी अशा आकर्षणाची हाक पडू शकते त्याचे वास्तवपूर्ण चित्रण मेघना पेठे आपल्या कादंबरीच्या निवेदिकेच्या माध्यमातून करतात.
8. रोबो – दीनानाथ मनोहर
औद्योगिक समाजात माणसाचे माणूसपण गिळले जाऊन रोबो बनण्याच्या प्रक्रियेला समोर ठेवून ही कादंबरी लिहिली आहे. लष्करी जीवनात माणसाचे जसे बराकीकरण केले जाते तसेच ते उरलेल्या सामान्य जीवनातही कसे होत असते हे या कादंबरीने मानवाच्या दैनंदिन जीवनाच्या संवेदनक्षम चित्रणातून दाखवून दिले आहे.
9. रिबोट – जी के ऐनापुरे
जी के ऐनापुरे यांची ‘रिबोट’ ही कादंबरी जागतिकीकरणानंतर मुंबईतील गिरणीकामगारांचे तुटत जाणे केंद्रभागी ठेवून लिहिली आहे. हे चित्रित करत असताना कादंबरी आपले भाषिक, सांस्कृतिक व्यवहार आणि त्यातील निरुद्देशपणावर भाष्य करते.
10. चाळेगत – प्रवीण बांदेकर
कोकणातील भौतिक व सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहिली आहे. भ्रष्टाचाराचे, दादागिरीचे राजकारण, अस्मितेचे संकुचित राजकारण याचे आतून दर्शन या कादंबरीत होते. मानवी जीवनावर या साऱ्यांचे होणारे भयंकर परिणाम चाळेगत मध्ये दिसून येते.