वाटा दुर्गभ्रमणाच्या – दुर्गप्रेमींसाठी एक नवी भेट

सातारा हा गडकिल्ले आणि पर्यटनस्थळे यांनी संपन्न असलेला जिल्हा. साताऱ्याची शान आलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून ते पार वारुगड संतोषगडापर्यंत असलेले किल्ले, कास – बामणोली सारखी पर्यटनस्थळे किंवा अगदी पाटेश्वर यवतेश्वर सारखी नितांत सुंदर मंदिरे ही सातारा जिल्ह्याची खरी दौलत !!

पण सातारा जिल्ह्यातल्या दुर्गवैभवावर प्रकाश पाडणारं Exclusive पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. अनेक दुर्गलेखकांनी त्यांच्या अनोख्या शैलीत सातारा जिल्ह्यातल्या किल्ल्यांवर जरी लेखन केलं असलं तरी पूर्ण या जिल्ह्याच्या किल्ल्याचं सखोल वर्णन करणारं पुस्तक हे गिर्यारोहकांसाठी Most Awaited होतं आणि ती कमी भरून काढली आहे पुण्याचे अभ्यासू ट्रेकर संदीप तापकीर यांनी.

सातारा जिल्ह्यात एकूण 25 किल्ले आहेत. पुस्तकाची सुरुवात साताऱ्याचा मानबिंदू आलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून होते. गडावर येण्याचे मार्ग, गडदर्शन व गडाचा उपलब्ध इतिहास या तीन भागात पुस्तकाची विभागणी केली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास वाचूनच पुस्तकातील इतर किल्ल्यांच्या Detailing बद्दलची खात्री पटते. प्रतापगड किल्ल्याबद्दलचे प्रकरण तर लेखकाने अत्यंत तपशीलवार लिहिले असून इतिहासही रोमांचकारी वाटेल अश्या ओघवत्या भाषेत लिहिला आहे.

पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक किल्ल्याच्या प्रकरणात त्या किल्ल्याच्या आजूबाजूला असणारी प्रेक्षणीय स्थळे सुद्धा लेखकाने मुद्दामून नमूद केली आहेत. त्यामुळे ट्रेकरची दृष्टी फक्त किल्ल्यापुरती मर्यादित न राहता आजूबाजूच्या पर्यटनस्थळं व ऐतिहासिक स्मारकांवरही त्याचे लक्ष आवर्जून वेधले जाते.

सातारा जिल्ह्यातले प्रसिद्ध किल्ले सोडता महिमंडणगड, पांडवगड, भूषणगड,गुणवंतगड, भैरवगड इत्यादी किल्ले तसे फारसे ट्रेकर्सच्या नकाशावर नाहीत. पण या पुस्तकाद्वारे त्यांची नव्याने ओळख लेखकाने करून दिली आहे. पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील किल्ल्यावरच्या वास्तू दाखवणारे नकाशे. हे नकाशे आणि गडाची माहिती सोबत घेऊन गड फिरल्यावर एक नवा अनुभव ट्रेकर्सना मिळेल यात शंकाच नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतोषगड किल्ल्याचा कायापालट करणाऱ्या पुण्याच्या “शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन” या संस्थेच्या कार्याची माहिती या पुस्तकात असून त्यांनी गडावर केलेलं काम व त्यामुळे गडाच्या रूपात पडलेला आमूलाग्र फरक याबद्दल त्यांना योग्य ते श्रेय द्यायला लेखक विसरलेले नाहीत.

पुस्तकात सुधारणेला वाव आहे ते म्हणजे पुस्तकातील किल्ल्यांचे फोटो. कृष्णधवल छायाचित्रे असल्याने त्याच्या छपाईदरम्यान येणारे मर्यादित स्वरूप स्वाभाविक आहे. पण पुढच्या आवृत्त्यांमध्ये रंगीत छायाचित्रे देता आल्यास व ते किमतीच्या गणितात बसत असल्यास पुस्तकाचा दर्जा अजून उजवा ठरेल.

थोडक्यात सातारा जिल्यातील किल्ल्यांचे Ready Recknor संदीप तापकीर यांनी ट्रेकर्ससाठी पेश केलं आहे. अगदी माफक किमतीत हा खजिना तुमच्या हातात पडणार आहे.त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि हे दुर्गवैभव आवर्जून अभ्यासा हीच सदिच्छा

 

पुस्तक नाव: वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले

अभिप्राय : ओंकार ओक