आनंदी पालकत्वाचा मार्ग
पालकत्व हा प्रत्येक पालकाचा आपल्या मुलांच्या दृष्टीने असणारा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, आपल्या मूलाची वाढ योग्य प्रकारे व्हावी, समाजात त्याची वर्तणूक चांगली हवी, आपलं मूल हुशार व्हावं, डोक्याला कुठलाही ताण न देता, कुठलाही त्रास न होता आपल्या मुलाचं संगोपण व्यवस्थित व्हावं, आपलं मूल आणि आपण स्वतः आनंदी असावं असा विचार करणा-या पालकांपैकी तुम्ही एक आहात? डॉ. किंजल गोयल लिखित “आनंदी बालक आनंदी पालक” हे पुस्तक अशा सर्व पालकांसाठीच आहे.
लेखिका स्वतः मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळे पालक आणि मुले अशा दोघांच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी सर्व समस्यांचे उपाय, प्रश्नांची थेट उत्तर या पुस्तकात अगदी सोप्या व प्रत्येकाला ती पटतील अशा भाषेत मांडली आहेत.
लहानपणापासून ते कुमारवयीन मुलांपर्यंत, पौगंडावस्थेपासून ते मुलं मोठी होईपर्यंत त्यांना योग्य पद्धतीने वाढवणं हा एक जिकरीचा पण तितकाच उत्सुकतेचा विषय आहे. पालकत्वाच्या प्रवासात पालकांना अनेक आव्हानांना, अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. मूल चिडचिडं, रागीट होणं, मुलांनी खोटं बोलणं, मुलांनी चुकीचा मार्ग अवलंबन, वयानुसार मुलांमध्ये होणारे शारिरीक-मानसिक बदल, त्यातून त्यांची होणारी जडणघडण, मुलांनी पालकांचं न ऐकणं, उलट बोलणं यामुळे पालक आणि मुलांमधला दुरावा वाढत जातो. मुलांच्या वर्तनापुढे पालक हतबल, चिंताग्रस्त होतात. मुलांना वाढवताना पालकांनाही अनेकदा कठोर व्हावं लागतं. त्याचा परिणाम ब-याचदा नकारात्मक झाल्याची उदाहरणं आपण पाहतोच. पालकत्वाचा मार्ग अत्यंत सुकर, विनाअडथळा असावा असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. परंतु हे होण्यासाठी ज्या पद्धतीचा संवाद पालक आणि मुलांमध्ये व्हायला हवा तो होत नाही. पालक म्हणून झालेल्या चूकांबद्दल अपराधभावना अनेक पालकांच्या मनात असते. पालकत्वात येणा-या समस्यांवर सकारात्मक उपाय शोधण्याची तंत्रे यात वाचायला मिळतील.
समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवण्यापेक्षा त्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काय पावलं उचलावीत त्याबद्दल यात सांगितलं आहे. परंतु सर्वच समस्या सहज सुटणा-या असतात असं नाही. योग्य प्रकारे सर्व काळजी घेतली आणि पुस्तकाप्रमाणे सर्व गोष्टी केल्या तरी समस्या राहत असतील तर शांत राहा! हे होणारच आहे. प्रत्येक समस्या आधीपासून थोपवता येणं हे कोणत्याही पालकासाठी अशक्य आहे. जे टाळता येण्यासारखं आहे ते टाळायचं आणि त्यातूनही ज्या समस्या सामो-या येतील, त्यातून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढायचा हे खरं कौशल्य आहे. हे कौशल्य शिकण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
आपण मुलांकडून जशा अपेक्षा ठेवतो, त्याचप्रमाणे स्वतः मध्ये बदल करून घेण्यास, स्वतः कडे नसलेल्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. फक्त मुलांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्याला घडविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न करणारे पालक आपल्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात हे या पुस्तकातून शिकायला मिळेल.
मूल वाढवताना अनेकदा असे प्रसंग येतात की घरात ताणतणाव निर्माण होतो, अंगावर पडणा-या नवीन जबाबदा-यांमुळे नवरा-बायकोमधील कलह वाढतो, आपल्या कित्येक गोष्टी सोडून द्याव्या लागतात, नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात, तडजोड करावी लागते, आपला प्राधान्यक्रम बदलावा लागतो. काय योग्य नि काय अयोग्य हे प्रसंगानुरूप आपण शिकत जातो. पालकत्वाची जबाबदारी पार पाडताना आई किंवा बाबांचा कमी-अधिक सहभाग असून चालत नाही तर दोघांचाही समान सहभाग असावा हा विचार लेखिकेने मांडला आहे व तो किती योग्य आहे हे तुम्हाला नक्की पटेल.
जबाबदारीच्या ओझ्याखाली पालक इतके दबून जातात की आपल्या आवडी-निवडी जपणं, स्वतःसाठी वेळ काढणं, जगण्यातला आनंद घेणं विसरून जातात. मुलांचं हित कशात आहे याला तुम्ही जितकं महत्त्व देता तितकंच महत्त्व तुमची वैयक्तिक प्रगती, सुख कशात आहे यालाही द्यायला हवं. तुम्ही आनंदी असाल तरच आनंदी पालकत्व घडणं शक्य होईल. केवळ आनंदी मूल वाढवणं हा या पुस्तकाचा उद्देश नाही तर पालक आनंदी असणं हा ही एक उद्देश आहे.
किंजल गोयल यांनी स्व अनुभवातून शिकलेल्या गोष्टी तसेच जगभरातल्या पालकांशी केलेली चर्चा, त्यांचे अनुभव, लोकांची मतं, त्यातून मिळत गेलेली उत्तरं यांची भर घालून या पुस्तकाला प्रॅक्टिकल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाचा विषय अशा पद्धतीने हाताळला आहे की कोणताही पान वाचायला घेतलं तरी ते उपयुक्त ठरणारं आहे. पुस्तक क्रमवार वाचण्याची गरज नाही. त्यामुळे मुलांना वाढवताना ज्या समस्येला तुम्ही तोंड देत आहेत त्याचं उत्तर तितक्यात सहज शोधणं तुम्हाला यामुळे शक्य होणार आहे.
जगभरातल्या पालकांच्या समस्या, उपाय आणि पालकत्वाचा दृष्टिकोन यांचं एकत्रीकरण, मुलांना वाढवत असताना पालकांच्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल या पुस्तकात दिलेले आहेत.. केवळ मुलांच्याच नव्हे तर पालकांच्या वाढीविषयीचं हे पुस्तक जरूर वाचा.