आमची मुलं सगळं खातात!’ – मुलांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक
आमची मुलं सगळं खातात!” या शीर्षकावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की हे पुस्तकमुलांच्या आहाराशी संबंधित आहे. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या तक्रारी पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जवळपास प्रत्येक मुलामध्ये कधी ना कधी पोषक अन्नाला बघून नाक मुरडण्याचा (अव) गुण उफाळून येतोच. त्यामुळे पालकांच्या नाकी नऊ येते. वास्तविक, पोषक अन्न खाणे हा मुद्दा प्रत्येकासाठीच गहन व विचार करायलालावणारा एक मुद्दा बनलेला आहे, विशेषकरून मुलांच्या बाबतीत. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ‘आपण जे खातो तसेच बनतो’हे आपल्याला जरी पटत असलं तरी आहाराच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन कुठेतरी कमी पडतं आणि त्यामुळे आहाराच्या चुकीच्या पद्धती अवलंबल्या जातात.
मग असा मार्गदर्शक शोधायचा कुठे?हल्ली इंटरनेट एका क्लिकवर उपयुक्त अन्नपदार्थांची माहिती आपल्याला जरी देत असले, तरी माहितीच्या या महासागरात आपण बुडून जाण्याची शक्यता अधिक असते. गुगलवर पोषक आहार किंवा हेल्दी डाएट टाकल्यावर इतक्या सूचना आपल्यावर येऊन कोसळतात की, आपण पार गोंधळून जातो. इतक्या सगळ्या माहितीतून योग्य माहिती कोणती हा प्रश्न पडतो. त्यामुळे योग्य आहार काय, कोणता, पोषक आहाराची सवय आपण स्वतःबरोबरच आपल्या मुलांनाही कशी लावावी याविषयी सोप्या शब्दांत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
लहान मुलांपासून किशोरवयीन, प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आहाराच्या मार्गदर्शनाची गरज का भासते? आपण तर आपल्या परीने चांगले अन्न खायचा, निरोगी जीवनशैली अंगीकारायचा खूप प्रयत्न करत असतो; पण अनेकदा कामाच्या वेळा, बैठी जीवनशैली आणि रेडीमेड अन्न खायची सवय अशा काही अडथळ्यांमुळे आपल्या आरोग्याला अनेक धोके उत्पन्न होतात व आरोग्याची हानी होते. ह्या पुस्तकामध्ये अन्नाबद्दल व योग्य आहाराबद्दल तसेच आहारसेवनाबद्दल सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल.पुस्तकाच्या लेखिका नीलंजना सिंग आहारशास्त्राच्या क्षेत्रात गेली ३० वर्षे काम करत असून त्या स्वतः एक ख्यातनाम आहारतज्ज्ञ आहेत. स्वतःचा अनेक वर्षांचा अनुभव व अभ्यास ह्या पुस्तकातून त्या आपल्यासमोर सादर करतात.
मुलांना उत्तम आहार देणे महत्त्वाचे का आहे? आणि हे देताना तो आहार त्यांच्यासाठी आनंददायक कसा बनवायचा? पालक म्हणून असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर यावर अनेक उपाय, क्लृप्त्या लेखिकेने दिल्या आहेत. हे उपाय आचरणात आणणे सहजशक्य आहे तेही कोणत्याही प्रकारच्या ताण-तणावाशिवाय. मुलांच्या आहाराबाबत हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक करेल. जिथे दोघेही पालक नोकरी करणारे आहेत, त्यांच्या दृष्टीने लागणा-या टिप्स, अन्नपदार्थ अधिक आकर्षक कसे बनवावेत, सहज-सोप्या पाककृती, मुलांच्या पोषक आहाराबद्दलच्या सूचना, आहारमूल्यांच्या ‘योग्य’ प्रमाणाची माहिती व अॅक्शन प्लॅन या पुस्तकात उत्तमरीत्या दिले आहे.
जंकफूड, डाएटच्या नावाखाली होणारा अतिरेक व शारिरीक हानी, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, चुकीचे अन्नपदार्थ व त्यामुळे विविध रोगांना मिळणारे आमंत्रण या आजच्या आधुनिक आयुष्यातील हानिकारक समस्यांचा आहारशास्त्राच्या अनुषंगाने या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. घरगुती, पौष्टिक अन्न बघताक्षणी आनंदित होणारे बालक पाहण्यासाठी आतुर असलेल्या सर्व पालकांसाठी हे पुस्तक एक हक्काचे संदर्भपुस्तक ठरेल, यात शंका नाही.