संतसाहित्यातील सामाजिकता’ : संतगाथेच्या सामाजिक तत्वज्ञानाचे सार

संतांची चळवळ हा भारतातील प्रबोधनकाळ आहे.
वारकरी चळवळीचा मराठी लोकजीवनावरील झालेला विलक्षण प्रभाव आजही अबाधित आहे. तसाच तो मराठी साहित्यावरही आहे. त्यामुळे वारकरी चळवळ किंवा संत साहित्य याचा सतत नव्याने अभ्यास होत राहिला आहे. हा अभ्यास केव्हाचाच मराठी प्रदेशाच्या पलीकडे जावून इंग्लिश व इतर विदेशी भाषांमध्ये पोहचला आहे. संत चळवळीचे व संत साहित्याचे अनेक पैलू नव्या अभ्यासातून पुढे येत आहेत. संत साहित्याची प्रायः प्रेरणा ही सामाजिक परिवर्तनाचा ध्यास ही राहिली आहे, त्यामुळे संत साहित्याचा समाजप्रबोधन व सांस्कृतिक स्वरूप या अंगाने केलेला अभ्यास व संशोधन अधिक मोलाचे आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तानाजी राऊ पाटील यांनी अशाच पद्धतीची मांडणी ‘संत साहित्यातील सामाजिकता’ या ग्रंथात केली आहे.

पहिल्या प्रकरणातच लेखकाने सदर संशोधकीय ग्रंथामागची भूमिका विस्तृत केली आहे. संत सहित्याची निर्मिती समाजाच्या प्रबोधनाच्या जाणिवेतून झाली आहे. त्यामुळे संत सहित्याच्या समाज शास्त्रीय समीक्षेतून तत्कालीन सामाजिक वास्तवावर प्रकाश पडतो. संतांनी आत्मिक उन्नतीच्या मार्गाचा वापर समाजबदलासाठी कसा केला हे स्पष्ट होते. लेखकाने संत चळवळीच्या या समाज परिवर्तनवादी प्रयोगाला आध्यात्मिक लोकशाही अशी संज्ञा वापरली आहे. ज्ञानेश्वर ते तुकाराम असा संपूर्ण संत परंपरेचा आढावा या ग्रंथात घेतला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतमंडळीच्या साहित्यातील सामाजिकतेची मांडणीसाठी स्वतंत्र विस्तृत प्रकरणे लिहली आहेत. एक प्रकरण ज्ञानदेव-नामदेव कालीन संतमंडळीच्या साहित्यातील सामाजिकता यावर लिहले आहे. यामध्ये संत जनाबाईवर विस्तृत स्वरुपात मांडणी केली आहे. त्याबरोबरच निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई ही भावंडे, नामदेवाचे सर्व कुटुंबीय, त्यांचे गुरु विसोबा खेचर, गोरो कुंभार, चोखामेळा, सावता माळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, कान्होपात्रा, सोयराबाई या व अशा समाजातील सर्वच वर्गातील संतमंडळीचे कार्य व साहित्य याचा आढावा या प्रकरणात घेतला आहे. शेवटच्या प्रकरणात आधुनिक मराठी सहित्यावर संतसाहित्याचा कसा खोलवर परिणाम झाला आहे हे स्पष्ट केले आहे.

प्रस्तुत ग्रंथातील बरीच मांडणी काही आशयसूत्रांच्या स्वरुपात केली आहे. त्यातील महत्वाचे आशयसूत्र आहे संत मंडळीनी सगुण ते निर्गुण असा भक्तीमार्गाचा केलेला प्रवास. या मध्ये प्रामुख्याने नामदेव, तुकाराम हे संत येतात. या दोहोंनी लौकिक जीवनाचा परिपूर्ण प्रवास करत अलौकिक व्यक्तिमत्व घडवण्यापर्यंतचा प्रवास केला. कवी म्हणून, संत म्हणून आणि समाजशिक्षक म्हणून ते उच्चतर अवस्थेला पोहचले. मोक्षप्राप्ती ही ऐहिक, लौकिक जीवनात प्राप्त करता येऊ शकते. त्याकरता सन्याशीच होण्याची गरज नाही, असे तत्वज्ञान संत परंपरेने प्रस्थापित केले. हे या ग्रंथाच्या मांडणीतील पुढचे आशयसूत्र. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम या संतांनी याबाबत लोकांना जागृत केले किंवा स्वानुभावरून वस्तुपाठ घालून दिला. विट्ठल हा केवळ मूर्तीरूपातील, मंदिरातील देव नव्हता. विठ्ठल अनेक संत रचनांमध्ये सत्याची प्रतिमा म्हणून येतो. याहीपुढची पायरी म्हणजे हे सर्व संत विट्ठलाला आपली माउली मानतात, बाप मानतात, सखा मानतात. विट्ठलाचे सामान्यीकरण हे या ग्रंथात मांडलेले आणखी एक आशयसूत्र. संत जनाबाईच्या अभंगांमध्ये हे सर्वाधिक प्रभावीपणे जाणवते. संत जनाबाईवरील प्रकरण हे या ग्रंथातील सर्वांत उत्कटतेने मांडणी केलेले प्रकरण आहे. जी अनाथ होती, जिचा कुणी रक्ताचा सगासोयरा न्हवता त्या जनाबाईला संत सहवासात आणि विट्ठल भक्तीत जीवनाचा अर्थ सापडतो. आध्यात्मिक लोकशाही हे या ग्रंथातील महत्वाचे आशयसूत्र. संत चळवळीत समाजातील सर्वच स्तरातील लोक सहभागी झाले. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतून चोखामेळा, सोयराबाई, बंका असे संत पुढे आले. शुद्र जातीतून गोरा कुंभार, नामदेव, तुकाराम, सावता माळी तसेच मुक्ताबाई, जनाबाई, गोराई अशा स्त्रिया यात होत्या. कलावंतीणची पोर म्हणून हीन मानल्या गेलेल्या कान्होपात्राला संत कुटुंबात मानाचे स्थान मिळाले. स्त्री संतांच्या साहित्यातून महिला वर्गाचे प्रश्न समोर आले. वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या या संतमंडळीना एकमेकांप्रती प्रचंड आदर कसा होता ते लेखकाने मांडले आहे. जनाबाई ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या आध्यात्मिक कार्याची गौरवी गाते. ती चोखामेळाला अस्पृश्य म्हणून सहन करावा लागणारा त्रास मांडते. ती स्वतःचा उल्लेख ‘नामयाची दासी’ असा करते. नामदेवाच्या अभंगात ज्ञानेश्वरांविषयी आदर दिसून येतो. पुढे संत एकनाथ या सर्व संतमंडळीना पूजनीय मानून आपले प्रबोधनकार्य चालू ठेवतात. त्यांच्या सर्व सहित्यात समाजातील अध: स्तराबद्दल कमालीची करुणा आढळून येते. समाजातील कंटक, दांभीक वृत्तीवर संतांनी सडेतोडपणे केलेला हल्ला लेखकाने मांडला आहे. यात प्रामुख्याने नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संत येतात.

संतचळवळीविषयी काही ऐतिहासिक तत्थे व बारकावे, विविध साहित्यप्रकाराविषयी विस्तृत माहिती यासाठीही सदर ग्रंथ उपयुक्त ठरतो. अभंग, ओव्या, भारुडे, कीर्तने, गौळणी, विराण्या याविषयी वाचकाला विस्तृत माहिती मिळते. एकनाथांच्या भारुडातून गावगाड्याचे चित्र उभे राहतेच पण त्यांनी मांडलेले भटक्या जमातींचे चित्रणही समाजशास्त्रीय अभ्यासाकरता महत्वाचे ठरते. हा महत्वपूर्ण पैलू डॉ. तानाजी पाटील अधोरेखित करतात. नामदेवाच्या आणि जनाबाईच्या अभंगांमधून त्यांच्या काळातील सर्व संतांचे चरित्र उभे राहते. शिवाय प्रत्येक संतांच्या काव्यात आत्मचरित्रात्मक भाग आहे. ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टिकोणातून त्याचे महत्व लक्षात येते. तुकारामाच्या कवितांचे इंद्रायणीत बुडवले जाणे, कान्होपात्राचा देहत्याग, चोखोबाचा छळ, नामदेवाचा उत्तर भारतातील प्रवास अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण नोंदी या ग्रंथात वारंवार आढळतात.

शेवटचे प्रकरण आधुनिक मराठी साहित्यावर संत साहित्याचा पडलेला प्रभाव वर्णन केला आहे. यात लेखक मांडतो की नामदेव ढसाळ यांची विद्रोही कविता तुकारामाशी नाते सांगते. केशवसुत, बोरकर, बालकवी ते कोलटकर यांच्यावर ज्ञानेश्वर-तुकारामाचा प्रभाव आहे. हा तर्क ते अलीकडचे श्रीकांत देशमुख, दासु वैद्य यांच्यापर्यंत लावतात. कविता हा आत्मशोधनाचा संतांनी धुंडाळलेला मार्ग आणि समकालीन मराठी कविता किंवा साहित्यातील आत्मशोधाची प्रेरणा यांच्यातील धागा अगदीच स्पष्ट होतो.

संतसाहित्याच्या अधिक अभ्यासासाठी प्रत्येक प्रकरणामागे दिलेल्या संदर्भ पुस्तकांची सूचीही महत्वाची आहे. सदर ग्रंथ हा महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, संत चळवळीतील अनुयायी सर्वांना लाभदायक ठरेल असा आहे.

– सागर कांबळे
टीम विश्वकर्मा पब्लिकेशन्स