Tags:
लिहित्या हाताच्या स्त्रिया – मराठीतील स्त्री लेखिका
कथा-कादंबरी हा समाजाशी आतून निगडित असलेला साहित्यप्रकार आहे. लोकशाही मूल्यांचे निकष लावायचे म्हटलं तर दलित, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी अशा उपेक्षित जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशयसंपन्न झाले आहे. मराठी कथा कादंबरी चे दालन ज्या स्त्री लेखिकांनी समृद्ध केले आहे. त्याचा हा थोडक्यात आढावा.
कथा कादबरी लेखनात सर्वप्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारी लेखिका म्हणजे विभावरी शिरूर कर. त्यानंतर 1970 च्या दशकापर्यंत सकस असे स्त्री-केंद्रित लेखन अपवादानेच आढळते. 1970 च्या दशकात जगभरात स्त्रीवादाची चर्चा मूळ धरू लागली होती. स्त्रियांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सामाजिक चळवळी जोर धरू लागल्या होत्या. त्यामुळे 1975 नंतरच्या काळात अनेक स्त्रिया लिहित्या झाल्या. या काळातील स्त्री-केंद्री कथा-कादंबरीलेखनामध्ये कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, गौरी देशपांडे, आशा बगे, प्रतिभा रानडे, माधवी देसाई, अरुणा ढेरे, शांता गोखले, अंबिका सरकार, नजुबाई गावित, प्रतिमा इंगोले, सानिया या लेखिकांचा समावेश होतो.
मालतीताई बेडेकर या आधुनिक मराठी साहित्यात स्त्रीवाद मांडणाऱ्या लेखिका. त्यांनी विभावरी शिरूरकर या नावाने लेखन केले. प्रौढ स्त्रियांना केंद्रीभूत ठेवून त्यांनी कथा लिहिल्या. स्त्रियांचा कोंडमारा करणा-या प्रथा परंपरांवर त्यांनी आपल्या कथा साहित्यातून हल्ला केला. स्वजातीतील वर मिळत नसेल तर परजातीतील वर स्वीकारण्याची तयारी विभावरींच्या कथेतील नायिका दाखवतात. तत्कालिन समाजपरिस्थितीच्या मानाने त्यांच्या नायिकांचे हे वर्तन बंडखोर ठरते. मुली दाखवण्याच्या कार्यक्रमांमुळे उपवर मुलींच्या मनावर येणारे मानसिक दडपण विभावरींच्या कथेमधून दाहकपणे दिसून येते. विभावरी शिरूरकर यांनी स्त्रीजीवनातील समस्यांची नवी बाजू समाजापूढे आणली. त्यांचा ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह स्त्रीवादी साहित्यातील मैलाचा दगड ठरला.
स्त्रियांकडे कल्पकतेचा अभाव असतो, असा आरोप लेखिकांवर कायम केला जातो. पण कमल देसाई आणि त्यांचं साहित्य म्हणजे या आरोपाला एक सणसणीत उत्तर आहे. काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई’ प्रसिद्ध झाल्यावर कमल देसाई साहित्यातील फॅण्टसीची एक मिसाल बनल्या. कमल देसाईंच्या काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई (१९७५) या कादंबरीत प्राचीन मिथ्यकथांना नवे स्त्रीवादी अर्थ दिले आहेत. ही हॅट घालून मुक्तपणे वावरणारी आणि आपल्या पद्धतीने जीवनाचा अनुभव देणारी स्त्री म्हणजे जणू कमल देसाइंची प्रतिभा होती.
काळा सूर्य या कादंबरीची नायिका शेवटी गावातील पुरातन मंदिर तोडून टाकते आणि स्वतःही मरते.
1980 च्या दशकात मराठी विश्वात गौरी देशपांडे यांच्या वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या उल्लेखनीय ठरल्या.
गौरी देशपांडेच्या लघुकादंबऱ्या प्रबोधनाच्या मुल्यांचा पुरस्कार करतात. तिची पात्रे व्यक्तिवाद जोपासणारी, बौद्धिक तेनुसार चालणारी आहेत. ‘एकेक पान गळावया’ हे याचे उत्तम उदाहरण. ‘एकेक पान गळावया’ या गौरी देशपांडेच्या पुस्तकात ‘एकेक पान गळावया’, ‘कारावासातून पत्रे’ आणि ‘मध्य लटपटीत’ अशा तीन लघुकादंबऱ्या आहेत. स्त्री-पुरुष संबंधाच्या विविध शक्यता त्यांनी तिन्ही कादंबऱ्यांतून मांडल्या आहेत. एकेक पान गळावया हे नवरा-बायको-मित्र यांच्या मैत्रीच्या, प्रेमाच्या अद्भुत नात्याचं दर्शन घडवणार कथानक. दोघांनी एकमेकांचे विश्व व्यापून टाकले असतानाही त्यांना इतर स्त्री, पुरुषांची वाटणारी ओढ माणसातल्या प्रेमाची आदिम व्यापकता दाखवते. तरी त्या दोघांनी विचारी संवेदनशील मनाने आपल्या नात्याबद्दल घेतलेली निष्ठेची भूमिका , त्यातून त्यांच्यात विकसित झालेली पराकोटीची मैत्री त्यांना नवरा-बायको या भूमिकाप्रधान नात्यापलीकडे नेते. ‘कारावासातून पत्रे’ मध्ये नायिका तिच्या पूर्वीच्या प्रियकराला तिच्या वेगवेगळ्या पुरुषांसोबतच्या वेगवेगळ्या प्रेमसंबंधाविषयी पत्रांतून लिहित राहते. एकेक पत्रातून तिची प्रेमाबद्दलची विचारपद्धत उलगडत जाते आणि एका टप्प्यावर आल्यावर आपल्याला या लघुकादंबरीच नाव ” कारावासातून पत्रे” का आहे याचा प्रत्यय येतो. ही कादंबरी वाचल्यावर असे वाटते की गौरीने सुरुवात केली आहे , हाच धागा पकडून फार व्यापक असं लिहिता येऊ शकतं. स्त्री पुरुष संबंधाविषयी नवं काही लिहू पाहणाऱ्याने या कादंबरीचे चिंतनशील दृष्टीने वाचन केले पाहिजे. १९८० च्या काळात गौरीने सहजपणे मांडलेले विचार आजही पचवायला जड जातील. ‘मध्य लटपटीत’ मध्ये चाळीशीतल्या स्त्री चा एकटेपणा, तिचा आत्मशोध, त्यातून झालेली विवाहव्यवस्थेबद्दलची संशयवादी विचारप्रक्रिया आणि पुन्हा त्याच नात्यात ‘स्व’ चे गवसणे दाखवले आहे. बऱ्याचदा असंही वाटतं की गौरी चाकोऱ्या ओलांडनारे नवं मांडते आणि पुन्हा स्वत:ला मर्यादित करते. पण या मर्यादा तिच्या विचारांपेक्षा लौकिकाच्या असाव्यात.
आधीच्या स्त्रीकेंद्री कथा कादंबऱ्यातील एक उणीव म्हणजे त्यातील आशयसूत्रांचे पांढरपेशी मर्यादा. उर्मिला पवार, बेबी कांबळे व नजुबाई गावित या दलित आदिवासी स्त्रियांचे आत्मकथनात्मक लेखन ही कोंडी फोडू पाहत होते. मात्र कादंबरी लेखनाच्या बाबतीत ही कोंडी कायम राहिली. अलीकडे 2000 नंतरच्या काळात कविता महाजन यांच्या कादंबऱ्यांनी समग्र स्तरातील स्त्री विश्व साहित्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मेघना पेठे यांचा उल्लेख स्त्रीवादी कथासाहित्यच्या संदर्भात धीट शैलीच्या कथालेखिका म्हणून केला जातो. स्त्रीने स्पष्ट व सरळ भिडणारे स्त्री-पुरूष संबंधांचे स्त्रीच्या दृष्टीकोनातून येणारे वर्णन मराठी कथेत नव्यानेच आल्याचा अनूभव मेघना पेठे यांचे कथासाहित्य देऊन जाते. स्त्रीचा एकाकीपणा आणि तुटलेपणा त्यांच्या कथांमधील पात्रांमधून जाणवत रहाताे. मेघना पेठेंच्या कथांच्या निवेदिका मनाच्या, शरीराच्या हाका निःसंकोचपणे मान्य करतात. लपवाछपवी करीत नाही की कसला दांभिकपणाचा आवही आणित नाही. स्त्रीलाही पुरूषदेहाविषयी अशा आकर्षणाची हाक पडू शकते त्याचे वास्तवपूर्ण चित्रण मेघना पेठे आपल्या कथेच्या निवेदिकेच्या माध्यमातून करतात. स्त्रीला सुध्दा कुठल्याही पाशात न अडकता शारीरिक गरज भागवावीशी वाटत नसेल काय? असा विचार मेघना पेठेंच्या कथेमुळे मराठी साहित्यात नव्याने दाखल झालेला दिसतो. मेघना पेठे यांच्या कथालेखनामागील दृष्टी ही आधुनिक आहे. तिच्यात स्त्रीवादी जाणीव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मेघना पेठे यांच्या कथा संपूर्ण समाजव्यवस्थेला निरीक्षणाचे लक्ष्य बनवतात. ‘नातिचरामि’ या कादंबरीतून हे स्फोटकपणे व्यक्त झाले आहे.
आजच्या कथा कादंबरी लेखिकांमध्ये शिल्पा कांबळे, नीरजा, संगीता पुराणिक, गौरी कानेटकर यांचा उल्लेख करता येईल. संगीता पुराणिक यांचा ‘कोलाज’ हा कथासंग्रह अनुभवसंपन्न लेखिकेचा रोकडा आत्मसंवाद आहे. मध्यमवयीन स्त्री ला / लेखिकेला प्राप्त झालेला व्यक्तिस्वातंत्र्यवादी दृष्टिकोन यातील कथांमधून प्रतीत होतो. मात्र या कथा केवळ स्त्री पात्रांच्याच कथा नाहीत. कॅनव्हास या कथेत आजीच्या प्रश्नावर केतकी विचार करायला लागते, “काय असेल माझ्यासोबत, माझ्या सत्तरीला? त्यांच्या कथांमधली पात्रे अनुभवसंपन्न जीवनाचा शोध घेतात.
शिल्पा कांबळे यांची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी दलित स्त्रियांचे जीवनवास्तव मांडते. उदारीकरण जागतिकीकरणामुळे एकूणच मानवी नातेसंबंधांवर परिणाम झाला. एकीकडे श्रीमंती वाढली तर दुसरीकडे वंचित-दुर्बल घटकांच्या जीवनातील बकालपणाही वाढला. शिल्पा कांबळे यांनी शोषित, अत्याचारित दलित स्त्रिया आणि समाज यांचे दु:ख मांडण्याचे काम केले आहे. कादंबरीची नायिका उल्का आणि इतर स्त्रिया, पुरूष, त्यांची मानसिकता, आंबेडकरी विचार, स्त्रीवाद असे विविध कंगोरे उलगडले आहेत.
आज सोशल मीडियामुळे व्यक्त होणे स्त्रियांना तुलनेने सोपे जाते आहे. काही स्त्री लेखिका सोशल मीडियावर लिहित असतात. मात्र त्यात फारशी सृजनशीलता दिसत नाही. सोशल मीडिया बाहेर येऊन काहीएक विचार करून रचण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे ही गोष्ट खरी कस लावणारी असते. तो मार्ग जास्तीत जास्त लेखिकांनी अंगिकारला पाहिजे
सागर कांबळे
टीम विश्वकर्मा पब्लिकेशन्स
टीम विश्वकर्मा पब्लिकेशन्स