मराठीतील लोकप्रिय पुस्तके
महाराष्ट्र राज्याला संतचळवळ तसेच समाजप्रबोधन चळवळीची परंपरा राहिली आहे. या पार्श्वभूमीमुळे आणि प्रभावी शिक्षणप्रसारामुळे मराठीतील साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. मराठीतील बरेच साहित्य भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रिय झाले आहे. आपण येथे मराठीतील काही लोकप्रिय पुस्तकांचा आढावा घेणार आहोत. येथे लोकप्रिय या निकषाचा अर्थ सर्वाधिक विक्री झालेली, चर्चा झालेली आणि समीक्षकांनी गौरवलेली पुस्तके.
कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीला तसा नवीनच.
हा साहित्यप्रकार ब्रिटिश वसाहतकाळात भारतात विकसित झाला. असे असले तरी सर्वाधिक लोकप्रिय मराठी पुस्तकांमध्ये सर्वांत जास्त प्रमाण कादंबरींचे आहे. शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली कादंबरी. मराठीतील बऱ्याच लोकप्रिय कादंबऱ्या या इतिहास, पुराणकथा यांच्याशी संबंधित आहेत. ‘मृत्युंजय’ने तिची भाषाशैली, कथानक मांडणी आणि आशय या सगळ्या बाबतीत वाचकांना मंत्रमुग्ध केले. सूर्यपुत्र कर्ण, कर्णाची उपेक्षा, दैवी वरदान असूनही वाट्याला आलेले भोग हे कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र. मृत्युंजयमधून मांडलेले कर्मवादाचे तत्वज्ञान, कर्णाची दानशीलता, सहनशीलता, कर्ण-दुर्योधन मैत्री, कृष्णाची दिशादर्शकता या सगळ्यातून वाचक बरेच बोध घेतो. शिवाजी सावंतांच्या ‘छावा’, ‘युगंधर’ या इतिहास व पुराणविषयक कादंबऱ्यांही गाजल्या.
वि स खांडेकरांचं ‘ययाति’ ही कादंबरीही पुराणकथेवर आधारित आहे. कामवासना किती भोगली तरी संपत नाही, वाढतच जाते, ही शिकवण देणाऱ्या या लोकप्रिय कादंबरीला मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विश्वास पाटील यांच्या ‘पानीपत’, ‘झाडाझडती’ आणि ‘महानायक’ या ऐतिहासिक कथानकावरील कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत ते त्यातील उत्कट प्रसंगवर्णनांमुळे.
भालचंद्र नेमाडेंची ‘कोसला’ ही मराठीतील सर्वाधिक चर्चिली गेलेली कादंबरी. 1963 साली ही कादंबरी अवतरली. मात्र मराठी मनावरील तिचे गारुड आजही कायम आहे. ‘कृषक किंवा ग्रामीण समूहाच्या परात्मतेचा सर्वोच्च अविष्कार’ या शब्दात समीक्षकांनी कोसला चा गौरव केला. कोसलापूर्व आणि कोसलानंतरची मराठी कादंबरी अशीही विभागणी केली जाते, यावरून कोसला चे मोठेपण लक्षात येते. कोसलाचा प्रभाव तिच्या वाचकांच्या सर्वच पिढ्यांवर पडला. हा प्रभाव साधासुधा नाही. कोसलाच्या प्रभावातून शहरात राहणारे आणि मूळचे गावकडचे तरुण परत ग्रामीण भागात पुन्हा स्थलांतरित (reverse migration) झाले.
कादंबरीव्यतिरिक्त आत्मचरित्रे, चरित्रे, ललित तसेच हलकीफुलकी विनोदी पुस्तकेही मराठीत लोकप्रिय आहेत. व पु काळेंचं ‘वपुर्झा’ आणि पु ल देशपांडेंचं ‘बटाट्याची चाळ’ ही दोन मराठीतील, खासकरून मध्यमवर्गीयांची आवडती पुस्तके. हे दोनही लेखक शहरी मध्यमवर्गीयांचे प्रिय लेखक आहेत. साने गुरुजींचं ‘श्यामची आई’, ए पी जे अब्दुल कलाम यांचं ‘अग्निपंख'(भाषांतरित), नरेंद्र जाधवांचं ‘आमचा बाप आन आम्ही’, वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ ही मराठीत लोकप्रिय झालेली चरित्रे-आत्मचरित्रे. सत्तरच्या दशकानंतर आलेल्या दलित आत्मकथनांनी मराठी वाचकांच्या अभिरुचीला आव्हान दिले. बलुतं’ (दया पवार), ‘उपरा’ (लक्ष्मण माने) ही पुस्तके लोकप्रिय ठरली. स्त्रीवादी लेखकांनीही मराठी साहित्याला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. यामध्ये गौरी देशपांडे (एकेक पान गळावया) हे पुस्तक लोकप्रिय झाले. एकेक पान गळावया हे नवरा-बायको-मित्र यांच्या मैत्रीच्या, प्रेमाच्या अद्भुत नात्याचं दर्शन घडवणार कथानक. याशिवाय विजया राजाध्यक्ष, कमल देसाई, कविता महाजन, अरुणा ढेरे या लेखिकांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
कथेच्या प्रांतात जी ए कुलकर्णी यांच्या कथांची लोकप्रियता आजही टिकून आहे. जी एं च्या कथेतील पात्रे जणू काही शापित जीवन जगत आहेत असं वाटावं असा कल्लोळ त्यांच्या कथांतून व्यक्त होतो. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ ही त्यांचे सुप्रसिद्ध कथासंग्रह. याशिवाय व्यंकटेश माडगूळकर, बाबुराव बागुल, उद्धव शेळके (शिळान) यांचे कथासंग्रह लोकप्रिय झाले. ‘जेव्हा मी जात चोरली होती’, ‘मरण स्वस्त होत आहे’ या बागुलांच्या कथासंग्रहांनी मराठी कथाविश्वात दारिद्र्य, जातिभेदाचे अनुभव समोर आणले. याशिवाय कथेच्या प्रांतात नारायण धारप यांच्या भयकथा, सुबोध जावडेकरांच्या विज्ञानकथा लोकप्रिय आहेत. कवितेमध्ये विशिष्ट अशा पुस्तकांपेक्षा उत्तम कवींच्या कविता लोकप्रिय होण्याचा कल जास्त आहे. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, शांता शेळके, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, नामदेव ढसाळ, कोलटकर या कवींच्या कविता अतिशय लोकप्रिय झाल्या.
मराठीत वैचारिक लेखनही तितक्याच आवडीनं वाचलं जातं. नरहर कुरुंदकरांची ‘जागर’, ‘शिवरात्र’ ही पुस्तके यात अग्रस्थानी आहेत. कुरुंदकरांनी या पुस्तकामधून जे राजकीय भाष्य केले आहे ते आजही मार्गदर्शक ठरते. इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांची लोकपरंपरेवरील पुस्तके अधिक वाचली जातात. आ ह साळुंखे यांचे ‘विद्रोही तुकाराम’ , रावसाहेब कसबेंचे ‘झोत’ ही सर्वाधिक चर्चीलेली पुस्तके. उत्तम कांबळे यांची ‘फिरस्ती’ ही ललितरम्य अनुभवकथने , मारुती चितमपल्ली यांची जंगलप्रवासाची वर्णने हे मराठीतील वेगळे लोकप्रिय लेखनप्रकार.
शेवटी समकालीन किंवा नव्या पिढीतील काही लोकप्रिय व सकस लेखकांच्या नावांचा उल्लेख करावा लागेल. हृषीकेश गुप्ते (दंशकाल), प्रतिक पुरी (मोघ पुरुस) हे कादंबरीकार; प्रणव सखदेव, बालाजी सुतार हे कथाकार दर्जेदार लेखन करत आहेत. कवितेच्या क्षेत्रात कल्पना दुधाळ (धग असतेच आसपास) स्वप्नील शेळके (धांदलमोक्ष) हे वाचनीय कवी आहेत.
सागर कांबळे
टीम विश्वकर्मा पब्लिकेशन्स