पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी हे एम.ए. (अर्थशास्त्र), पारंगत (सामाजिक शास्त्रे), डी.एच.ई. (शिक्षणशास्त्र) आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे ‘निर्णय’, ‘झेनोफोबिया’ हे कथासंग्रह आणि ‘कातळातील झरे’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये लिहिली आहेत. ‘एकच प्याला चहाचा’ या त्यांच्या एक तासाच्या नभोनाट्यास अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाले. त्यांनी ‘सहलेखक’ म्हणून ‘लढाई, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘तूच माझी आई’, ‘माहेरची माया’, ‘स्वामी माझे दैवत’ हे चित्रपट लिहिले असून, त्यांनी लिहिलेल्या ‘चिरंजीव आईस…’ या व्यावसायिक नाटकाचे 500 प्रयोग झाले आहेत. त्यांना आध्यात्मिक लेखनाची प्रेरणा त्यांच्या कीर्तनकार वडिलांकडून मिळाली. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक ‘चिंतनं’ लिहिली असून, श्री स्वामी समर्थ दैनंदिनीसाठी ते प्रतिवर्षी आध्यात्मिक लेख लिहितात. त्यांना साप्ताहिक सकाळ, विपुलश्री वासंतिक, गंगाधर गाडगीळ स्मृती, दै. केसरी वर्धापन दिन, अंतर्नाद आयोजित दि. बा. मोकाशी इत्यादी कथास्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या ‘तांडव’ या कथेला वाचकांनी निवडलेली सर्वोत्तम कथा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अंतर्नाद, हंस, किस्त्रीम, माहेर, मेनका, धनंजय, चंद्रकांत, अनुराधा, पुरुष उवाच, श्रीदीपलक्ष्मी, आपली राजधानी, नवल, रानवारा, हसवंती नवलकथा, आम्ही सारे ब्राह्मण इत्यादींमध्ये लेखन केले आहे.

Showing the single result