प्रतिभा रानडे यांची वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत एकूण 26 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘बदनसिब’ (नंतरच्या आवृत्त्यांसाठी ‘अखेरचा बादशहा’ – कादंबरी), ‘अफगाण डायरी’, ‘काबूल कंदाहारकडील कथा’, ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’, ‘परकं रक्त’ (कथासंग्रह), ‘स्त्री प्रश्नांची चर्चा’, ‘19वे शतक : महाराष्ट्र’, ‘यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी – एक आकलन’, ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’, ‘स्मरणवेळा’ (ललितलेखसंग्रह), ‘रेघोट्या’ (कादंबरी), ‘शुक्रवारची कहाणी’ (ललितलेखसंग्रह), ‘झांशीची राणी लक्ष्मीबाई’ (चरित्र), ‘अबोलीची भाषा’ (ललितलेखसंग्रह), ‘मरुगान’ (कथासंग्रह), ‘फाळणी ते फाळणी’, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’, ‘पाकिस्तान डायरी’, ‘ज्ञानकोशकार – गणेश रंगो भिडे’, ‘अनुबंध धर्म संस्कृतीचे’, ‘आर्थिक सत्ता, राजसत्तांची झळ’ ही त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे इंग्रजी भाषांतरदेखील प्रसिद्ध झाले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराबराबेरच अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर या पुरस्कारांचा समावेश होतो. त्यांना फोर्ड फाउंडेशनची संशोधनवृत्तीदेखील मिळाली होती. बृहन्मुंबई महानगर साहित्य संमेलन (मुंबई), मराठी वाङ्मय परिषद (बडोदा), मराठी महिला साहित्य संमेलन, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. ‘झांशीची राणी लक्ष्मीबाई’ या त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजीबरोबरच हिंदी, उडीया, कानडी या भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाला आहे.

Showing the single result