Thumbnail

डॉ. राजेंद्र माने हे साहित्यविश्वातले आघाडीचे नाव आहे. ते प्रथितयश साहित्यिक आहेत. आजवर त्यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यात 10 कादंबर्या, 5 कथासंग्रह, वळणावरची माणसं हा व्यक्तिचित्रसंग्रह, 3 लेखसंग्रह या साहित्यसंपदेचा समावेश आहे. मेनका, माहेर, जत्रा, किस्त्रिम, अक्षरभेट, चारचौघी, सुगंध यांसारख्या लोकप्रिय मासिकांमधून डॉ. माने यांनी कथालेखन आणि कादंबरीलेखन केले आहे. त्याचबरोबर, दैनिक सकाळमध्ये ‘मनातलं’, दैनिक ऐक्यमध्ये ‘लोकसंस्कृती’, तर दैनिक लोकमतमध्ये ‘सलाम नमस्ते’ या सदरांचं लेखन केलं आहे. याशिवाय सकाळ, पुढारी, ऐक्य यांसारख्या दैनिकांमधून प्रासंगिक लेखही प्रसिद्ध झाले आहेत. आकाशवाणीवर नभोनाट्य, कथाचिंतन प्रसारित झाले आहे. स्वराज्यमधील ‘अंतहीन’ ही कथा कन्नड भाषेत अनुवादित झाली आहे. सातारा जिल्हा ग्रंथ समितीचे ते सदस्य आहेत. ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात त्यांनी दीर्घकाळ आपला सहभाग नोंदविला आहे. साहित्य कलाविकास प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.